टीम द – लोकार्थ | बीड – जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांना राष्ट्रीय मार्गांशी जोडल्यानंतर खा. प्रितम मुंडे यांनी ग्रामीण भागातील रस्त्यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभारण्याच्या कामात आपले सातत्य असल्याची प्रचिती काल पुन्हा एकदा जिल्ह्याला दिली. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते आणि दळणवळण व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी आणलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या रस्त्यांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांनी काल केले. बीड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार रस्ते आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
वडवणी तालुक्यातील तिगाव तांडा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत एकूण सात कोटी अठ्ठाविस लक्ष रुपयांच्या तेरा किलोमीटरच्या रस्त्यांचे खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. तसेच केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या रस्त्याचे व केंद्रीय रस्ते निधीतून मंजूर रस्त्याचे ही त्यांनी लोकार्पण केले. सारणी सांगवी आणि तिगाव तांडा येथे उपस्थित ग्रामस्थांशी ही यावेळी खा. प्रितम मुंडे यांनी संवाद साधला.
यावेळी खा.मुंडे म्हणाल्या कि ‘पंकजाताई मुंडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असताना स्वप्नवत वाटावा असा अभूतपूर्व निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी मिळाला होता, या विकास निधीतून होणाऱ्या कामांची आजही लोकार्पण केली जात आहेत. तेंव्हाच्या तुलनेत आता रस्त्यांसाठी कमी निधी आणला असला तरी या रस्त्यांचे आपल्या जीवनावर चांगले आणि दूरगामी परिणाम होणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागात होणाऱ्या रस्ते निर्मितीमुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची प्रक्रिया सुलभ होणार आहे.सोबतच रुग्णांची हेळसांड देखील थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन कामे करत असून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे खा.प्रितम मुंडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी तिगाव तांडा इथे भाजपा नेते रमेशराव आडसकर, पोपटराव शेंडगे, मच्छिन्द्र झाटे,संजय आंधळे,धनराज मुंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर सांगवी सारणी इथे आ. नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, भगवान केदार,संतोष हांगे, डॉ. वासुदेव नेहरकर,विष्णू घुले, रमाकांत मुंडे, दत्ता धस, विजयकांत मुंडे, वसंत केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
समाज माध्यमांद्वारे सकारात्मकता पसरवा, तरुणांना खा.प्रितम मुंडे यांचे आवाहन
सद्यस्थितीत समाज अत्यंत संवेदनशील प्रक्रियेतून जातो आहे. सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना समाजात दुही निर्माण होणार नाही याची जवाबदारी आपली आहे. अशा वातावरणात आपण सकारात्मकता पसरवण्याचे काम करावे. सामाजिक एकोपा, सौख्य नांदावे याची काळजी घ्यावी. तरुणांनी संयम बाळगताना जेष्ठानी देखील त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. विकास निधी आणणे या जवाबदारीसह सामाजिक सलोखा, बंधुत्व अबाधित ठेवणे देखील आपली जवाबदारी असल्याने सर्वांनी संयम, आपुलकी, सदभावना ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.