पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा :
जेष्ठ पत्रकार अभय निकाळजे,
औरंगाबाद.
लोकार्थ..
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बहुजन नेतृत्व ज्या ज्या नेत्यांनी केले, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे हे नाव अजरामर झालेले आहे. जात, धर्म, पंथ आणि विचारसरणी या सगळ्यांना बासनात बांधून गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या न्याय हक्कांसाठी एक लढा उभारला. त्या लढ्याची फलश्रुती भारतीय जनता पक्षाला आजही मिळते आहे. राजकीय पक्षांचा जिथे जनतेशी असलेला संवाद एकतर्फी सुरू आहे, अशा परिस्थितीत श्रावणातल्या महिन्यात गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा काढून पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोणत्याही राजकीय हेतू शिवाय काढलेली ही शिवशक्ती परिक्रमा सर्वसामान्य जनतेशी असणारी मुंडे परिवाराची नाळ घट्ट करणारी होती. म्हणूनच या परिक्रमेची म्हणावी तशी दखल प्रसारमाध्यमांनी घेतली नाही. म्हणूनच या परिक्रमेचे सामाजिक विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
साधारणतः महिनाभराचा काळ ही परिक्रमा पंकजा मुंडे यांनी पूर्ण करून झाला आहे. वेदना, समस्या आणि दुःख ऐकण्यासाठी पंकजा मुंडे या थेट आपल्या दारापर्यंत आल्या. जेव्हा आपलं म्हणणं कोणीच ऐकत नाही, अशा परिस्थितीमध्ये मायेने डोक्यावरून आणि खांद्यावरून हात फिरवण्यासाठी कोणीतरी आहे? हाच या परिक्रमेचा मूळ उद्देश होता. महाराष्ट्रातील राजकारणाचा घसरलेला स्तर पाहता, ज्या जनतेच्या जीवावर राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, त्या जनतेला राजकीय पक्षच नाही तर नेते पण विसरत चालले आहेत. त्यामुळे जनतेला त्यांच्या समस्या, वेदना आणि दुःख ऐकून घेणारा, तातडीने त्यावर तोडगा काढणारा असा नेता हवा आहे. हीच गरज ओळखून पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून पिंजून काढला. जनतेला गृहीत धरल्याशिवाय राजकारण होत नाही. तिथे पक्ष, विचार आणि निष्ठा यापेक्षाही पुढे जाऊन माणूस म्हणून विचार करावा लागतो. हाच विचार 35 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे यांनी रुजवला. त्याच विचाराची काच धरून पंकजा मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या घरात जाऊन त्यांच्या वेदना दुःख आणि समस्या ऐकून घेतल्या. हे करण्यासाठी राजकीय पक्षाचे बॅनर त्यांनी बाजूला ठेवले होते. तरीपण या शिवशक्ती परिक्रमेचा फायदा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत निश्चित पणाने होणार आहे. सातत्याने लोकांच्या मध्ये राहून लोकांसाठी लढण्याची वृत्ती गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये होती. म्हणून गोपीनाथ मुंडे हे फक्त भारतीय जनता पक्षाचे न राहता अखंड महाराष्ट्राचे नेते झाले. निवडणुकीपुरते पक्षी राजकारण करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार किंवा काँग्रेसचे नेते कधीच परके वाटले नाहीत. सत्तेत असो किंवा विरोधात असो जनतेच्या प्रश्नासाठी गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने लढले त्याच धरतीवर आज पंकजा मुंडे यांनी सर्वसामान्यांचा लढा उभा केला आहे. म्हणून साहेब गेल्यानंतरही पंकजा मुंडे यांच्या परळीच्या आणि मुंबईच्या बंगल्यावर ची गर्दी कमी झाली नाही.
राजकीय नेत्यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज जवळपास दाबून टाकलेला असताना ही शिवशक्ती परिक्रमा नवे बळ देणारी ठरली आहे. नेत्याच्या सभेला नाही, तर नेताच आपल्या दारी या पद्धतीने पंकजा मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. याआधी पण वेगवेगळ्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रभर आपला एक वेगळा असा जनसंग्रह तयार केला आहे.
गोपीनाथ मुंडे यांना जनतेने नेता केल होतं. सर्वसामान्यांचा चेहरा असणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना सामान्य कुटुंबातून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवणारी जनताच होती. तो वारसा न कळत्या वयात पंकजा मुंडे यांना मिळाला. म्हणूनच जनता आणि मुंडे परिवार यांचे एक नाते तयार झाले. मुंडे आणि जनता यांच्या नात्याला राजकीय लेबलची गरज नाही. असे भाग्य महाराष्ट्रातील अतिशय कमी लोकांना आणि नेत्यांना लाभले आहे. पंकजा मुंडे यांनी मुंडे साहेबांनंतर हा वारसा त्यांच्या पद्धतीने पुढे चालवला आहे. म्हणूनच मुंडे परिवाराचा काफीला हा दिवसागणिक वाढतो आहे. त्याचाच अनुभव या शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळाला. जनतेच्या पाठिंब्याशिवाय किंवा भक्कम पाठबळाशिवाय राजकारणाला अर्थ नसतो, याचे बाळकडू पंकजा मुंडे यांना बालपणातच मिळाले असल्यामुळे त्यांनी आपल्या राजकारणात जनतेला प्राधान्य दिले. म्हणूनच जेव्हा महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर खालावत आहे, अशा राजकीय वातावरणामध्ये एक सकारात्मक सुरुवात पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने केली आहे. राजकारणात आरोप होत असतात, एक राजकीय विजनवासही येत असतो, पण या सगळ्यावर मात करण्यासाठी जनता तुमच्या पाठीशी उभी राहते. हेच या शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिले आहे. या शिवशक्ती परिक्रमेची पाहिजे त्या प्रमाणात दखल माध्यमाने घेतली नाही. त्याचे म्हणावे तसे विश्लेषण झाले नाही. त्याची काही स्वार्थी राजकीय कारणे असू शकतात. त्याचा फारसा विचार न करता पंकजा मुंडे यांनी परिक्रमे नंतर आपल्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे. महाराष्ट्र ढवळून काढण्याची ताकद आत्ता सध्या दोनच राजकीय घराण्यांमध्ये आहे, त्यापैकी एक मुंडे आणि दुसरे पवार घराणे आहे. दोन्ही घराण्यांना फुटीचा सुरुंग लागलेला आहे. तरी अनुभवी शरद पवार ज्या पद्धतीने संयमी आणि स्थिर राजकारण करत आहेत. तशाच संयमी वृत्तीच्या पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहायला मिळाल्या. राजकीय वाद आणि कौटुंबिक संबंध दोन्ही परिवारांनी अतिशय चपखलपणे हाताळले आहेत. म्हणूनच राजकीय अशांतता, हल्ले होत असताना शांतता आणि संयम हा केवळ लोकांमध्ये जाऊनच मिळू शकतो. हेच या परिक्रमेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राला सांगितले आहे.
पंकजा मुंडे यांची राजकीय भूमिका काय असेल? असा प्रश्नही प्रसारमाध्यमांना पडला नाही. याचे कारण माध्यमांमधली जिज्ञासा कमी झाली आहे. एखादा राजकीय नेता राजकारणापासून दूर जाईल अशी परिस्थिती सध्याच्या महाराष्ट्रात निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. जाणीवपूर्वक काही लोकांनी राजकारणातून दूर जावे, यासाठी वेगवेगळी राजकीय अवूध वापरली जात आहेत. हाच राजकारणाचा खरा ऱ्हास आहे. म्हणूनच सकारात्मक दृष्टीने राजकारण करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे जास्त गरजेचे आहे. हाच संदेश शिवशक्ती परिक्रमेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राला दिला आहे.

