
टीम द लोकार्थ | बीड – फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद आणि ‘कोण आली रे कोण आली’ च्या घोषणेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचं शहरात अभूतपूर्व असं स्वागत झालं. मध्यरात्री अडीच वाजले तरीही प्रचंड जोश आणि उत्साह पहायला मिळाला. शहरात येण्यापूर्वी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं.
शिव-शक्ती परिक्रमेचा शनिवारचा संपूर्ण दिवस व रात्र इतर दिवसांपेक्षा वेगळी होती.धाराशीव येथून सकाळी ७ वा. सुरू झालेला प्रवास अपेक्षित वेळेच्या सात पट जास्तीचा होता. सगळीकडे फक्त स्वागत आणि सत्काराचाच मोठा जल्लोष होता. लाडक्या लेकीचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते बेभान झाले होते, त्यांचा आनंद अवर्णनीय असाच दिसून आला. बीड, वडवणी, ढेकणमोहा येथे स्वागत स्विकारून पंकजा मुंडे परळी तालुक्यात आल्या, सिरसाळा येथे त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं, त्यानंतर गोपीनाथ गडावर लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. पांगरी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी त्यांचं मोठया जल्लोषात स्वागत झालं.
मध्यरात्र होऊनही अभूतपूर्व
मध्यरात्रीचे एव्हाना अडीच वाजले होते, पहिल्यांदा इटके काॅर्नर आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंकजाताई मुंडे यांचं खूप मोठ जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. जेसीबीतून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, भला मोठा पुष्पहार घालून त्यांचं स्वागत केलं, शहर व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. युवा कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. यशःश्री निवासस्थान येथे सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं.
सोमवारी परिक्रमेचा समारोप
अखेरच्या श्रावण सोमवारी म्हणजे उद्या ११ तारखेला शिव-शक्ती परिक्रमेचा समारोप होत आहे.पंकजा उद्या सकाळी ८ वा. प्रभू वैद्यनाथास अभिषेक करतील, त्यानंतर १० वा. वैद्यनाथ मंदिरासमोरील प्रवचन मंडप सभागृहात महामृत्यंजय जपाने परिक्रमेचा समारोप होणार आहे. सर्व नागरिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.