मला कांहीही नको, फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठिशी असू द्या
पंकजाताई मुंडे यांचं महासांगवीच्या सप्ताहात फुलांच्या वर्षावात अभूतपूर्व स्वागत
जिल्हयातील प्रत्येक गडासाठी निधी दिला ; भविष्यातही आणखी देऊ
पाटोदा ।दिनांक २२।
श्रीसंत मीराबाई आईसाहेब संस्थान ही माझ्यासाठी हक्काची जागा आहे. माहेर आलेली लेक जसं सर्व काही हक्काने मागत असते, तसं मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, दुसरं काहीही नको, फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठिशी कायम असू द्या. लोकनेते मुंडे साहेबांचा वंचित घटकांच्या सेवेचा वसा घेऊन मी रात्रंदिवस काम करत आहे.एकीची ताकद जगाला दाखवून देण्याची वेळ आली तर एकजूट दाखवा अशा आवाहनवजा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तालुक्यातील महासांगवी येथे श्रीसंत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात आज उपस्थित भाविकांशी संवाद साधतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे, रामकृष्ण बांगर, मधुकर गर्जे, महेंद्र गर्जे आदी यावेळी उपस्थित होते. मीराबाई संस्थानच्या मठाधिपती ह.भ.प. राधाताई महाराज सानप यांनी यावेळी त्यांचं स्वागत केले.
श्रीसंत आईसाहेबांची भक्ती आणि आपल्या प्रेमामुळे मी दरवर्षी न चुकता याठिकाणी आवर्जून येते. लोकनेते मुंडे साहेबांवर आपण माझ्यापेक्षाही काकणभर जास्त अ प्रेम केलं आहे, त्यांच्या विचाराचा आणि सेवेचा वसा घेऊन मी आज काम करत आहे. समाजातील गोरगरिब, वंचित घटकांतील महिला, मुलींचा सन्मान वाढावा यासाठी माझे काम आहे. गेल्यावर्षी संस्थानने कर्मयोगिनी पुरस्कार देऊन माझा गौरव केला होता. माझ्या प्रत्येक संघर्षाला सोन्याची किनार तुमच्यामुळे मिळतेयं. चांगल्या विचाराला खतपाणी देणं आज काळाची गरज आहे असं पंकजाताई यावेळी म्हणाल्या. मंत्री असतांना जिल्हयातील प्रत्येक गडाला विकासासाठी निधी दिला, भविष्यात काही मिळाले तर गड पहायला बाहेरून लोकं येतील असा विकास करू मात्र जिल्हयातील गडं हे राजकारणाचे फड बनू नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अन् आज्जीबाईंनी काढली पंकजाताईंची दृष्ट !
पंकजाताई मुंडे यांचं सप्ताहात आगमन होताच भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात त्यांचं अभूतपूर्व असं स्वागत केलं. पंकजाताईंना पाहताच काही वयोवृद्ध आज्जीबाईनी गर्दीतून वाट काढत पुढे येऊन स्वतःच्या लेकीप्रमाणं त्यांच्या गालावरून मायेने हात फिरवला तसंच पदर घेऊन दृष्टही काढली. सर्व सामान्य लोकांचं हे निरागस प्रेम पाहून पंकजाताई देखील भारावून गेल्या.
••••