गरजवंत मराठ्यांचा विरोध उपमुख्यमंत्री अजितदादा मोडीत काढणार?

माळेगाव साखर कारखान्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त !
टीम द – लोकार्थ | पुणे – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने राज्याच्या बहुतांश भागात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली आहे.तसेच शासकीय,राजकीय व इतर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास देखील मराठा समाज कडाडून विरोध करताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे.
तीन दिवसांपूर्वी मराठा समाजाने दिलेल्या इशाऱ्यानंतर ही अजित पवार यांचा दौरा रद्द न झाल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे, यानंतर काल कारखाना प्रशासन,पोलीस दल आणि आंदोलकांची बैठक पार पडली, या बैठकीतही मराठा समाजाने अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच विरोध होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर माळेगाव साखर कारखाना परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्याप्रकारे बंदोबस्त वाढवला आहे ते पाहता अजित पवार मराठा समाजाचा विरोध मोडीत काढून मोळी टाकण्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहतात का हे बघणे रंजक ठरणार आहे.