गंगापूरमध्ये दोन रक्तदान शिबिरांचे आयोजन; शासकीय रक्तकेंद्राला रक्तसंकलन करून दिल्याबद्दल सन्मान
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड –
गंगापूर : रक्तदान हेच जीवनदान या सामाजिक भावनेतून गंगापूर येथील उम्मीद फाउंडेशनने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) विभागीय रक्तकेंद्रातर्फे फाउंडेशनचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. फाउंडेशनने शहरात आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांतून एकूण ३१७ रक्तपिशव्यांचे संकलन करून घाटी रुग्णालयाच्या रक्तपेढीला उपलब्ध करून दिले.
१२ रबीउल अव्वलच्या निमित्ताने उम्मीद फाउंडेशनच्या वतीने गंगापूर शहरात दोन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून संकलित झालेल्या ३१७ रक्तपिशव्यांमुळे गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली. या सामाजिक योगदानाची दखल घेत गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता घाटी रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात फाउंडेशनला गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. भारत सोनवणे आणि डॉ. अंजली कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. सुरेश हरबडे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असून, डॉ. पद्मजा सराफ या विभागीय रक्तकेंद्राशी संबंधित आहेत.
उम्मीद फाउंडेशनला मिळालेला हा सन्मान केवळ संस्थेचा नसून संपूर्ण गंगापूर शहराचा आणि समाजाचा गौरव असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदत करण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
No Comment! Be the first one.