अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय; पाच हजार रुपयांचा दंड
लोकार्थ प्रतिनिधी किशोर जाधव
पिशोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सुनील कडुबा मस्के (वय २३, रा. हरसूल, छत्रपती संभाजीनगर) याला छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व एकूण पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६०/२०२४ अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणाची सेशन केस क्रमांक १००/२०२५ अशी नोंद होती. न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(२), ३२९(४) व ३५१(३) अंतर्गत आरोपीला शिक्षा सुनावली. सर्व सश्रम कारावासाच्या शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, कलम ३३३ व ३५२ अंतर्गत आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात पिशोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत फरताडे यांनी तपास केला. न्यायालयीन पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. आर. सैय्यद, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड व महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल एल. पी. भोसले यांनी प्रभावी पैरवी केली. पिशोर पोलिसांच्या तपास व न्यायालयीन पैरवीमुळे या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाल्याची माहिती पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
No Comment! Be the first one.