दोन तासांत दिल्लीला हजर राहण्याची धमकी; मुकुंदवाडीत सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणातून (TRAI) बोलत असल्याचे भासवून, दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवत सायबर भामट्यांनी मुकुंदवाडीतील योगेश गुजर यांना तब्बल ४३ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी २२ ऑक्टोबर रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी योगेश प्रकाश गुजर (वय ४६, रा. महाजन कॉलनी, एन-२, सिडको) यांना फोन करून आपण दूरसंचार नियामक प्राधिकरणातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईल क्रमांकावरून दिल्लीतील लोकांना चुकीचे संदेश पाठवण्यात आले असून, याप्रकरणी दर्यागंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी भासवले. तसेच, दोन तासांत दिल्लीला हजर न राहिल्यास तुमचे सर्व मोबाईल क्रमांक बंद करण्यात येतील, अशी धमकी देऊन फिर्यादीला भीती दाखवली.
या धमकीच्या जाळ्यात अडकलेल्या गुजर यांची आरोपींनी ४३ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.
No Comment! Be the first one.