धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 58 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आठ जिल्ह्यांतील एकूण 3,26,700 मतदारांपैकी 1,17,686 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी मराठवाड्यात एकूण 842 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. जिल्हानिहाय मतदानाच्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या टक्केवारीत धाराशिव जिल्हा आघाडीवर आहे. धाराशिवमध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत 39.91 टक्के मतदान झाले होते. दुसरीकडे, प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांच्या संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आघाडीवर आहे.
जिल्हानिहाय मतदानाची आकडेवारी
- छत्रपती संभाजीनगर : 93,318 मतदारांपैकी 30,828 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 33.04%.
- जालना : 33,196 मतदारांपैकी 12,619 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 38.01%.
- परभणी : 26,664 मतदारांपैकी 8,934 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 33.51%.
- हिंगोली : 10,315 मतदारांपैकी 3,913 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 37.94%.
- नांदेड : 36,687 मतदारांपैकी 13,731 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 37.43%.
- लातूर : 39,703 मतदारांपैकी 13,753 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 34.64%.
- धाराशिव : 29,145 मतदारांपैकी 11,633 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 39.91%.
- बीड : 57,672 मतदारांपैकी 22,275 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 38.62%.
धाराशिवमध्ये सर्वाधिक मतदानाची टक्केवारी
दुपारी 2 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 39.91% मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात 38.62% आणि जालना जिल्ह्यात 38.01% मतदानाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे 33.51% मतदान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 33.04% असली, तरी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदानाचा टक्का किती वाढतो आणि आठही जिल्ह्यांमध्ये मतदारांचा अंतिम प्रतिसाद कसा राहतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरच्या आकारावरून आणि मतपत्रिका मतपेटीत टाकताना येणाऱ्या अडचणींवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 41 उमेदवार रिंगणात असल्याने मतपत्रिकेचा आकार मोठा झाला असून, मतदान केल्यानंतर मतपत्रिकेची घडी घालून ती मतपेटीत टाकताना अडचणी येत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घेतला आहे. स्वतः मतदान करण्यासाठी दोन मिनिटांऐवजी तब्बल पंधरा मिनिटे लागल्याचं सांगत, मतदान प्रक्रियेपूर्वी प्रात्यक्षिक का घेण्यात आलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बॅलेट पेपरचा आकार नेमका कसा आहे? त्याची घडी घालताना आणि मतपेटीत टाकताना मतदारांना अडचणी येत असतील तर मतदान कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.