मामाच्या गावाहून घरी परतताना अपघात; २६ वर्षीय अंजली तूपलोंढे यांचा दुर्दैवी अंत
लोकार्थ प्रतिनधी विजय बनसोड
गंगापूर मामाच्या गावाहून घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक स्कुटीला जोरदार धडक दिल्याने अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगापूर–वैजापूर रस्त्यावरील वाडगाव फाट्याजवळ घडली. अंजली कैलास तूपलोंढे (वय २६, रा. जामगाव, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे जामगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजली तूपलोंढे या वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे मामाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून इलेक्ट्रिक स्कुटीवरून जामगाव येथे घरी परतत असताना वाडगाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, लकी शहा आणि चेतन पंडित यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अंजली यांना उपचारासाठी गंगापूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, या अपघातप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे करीत आहेत.

No Comment! Be the first one.