भाजी खाल्ल्यानंतर ११ जणांना मळमळ, उलट्या; अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचार सुरू
अंबाजोगाई :* तालुक्यातील अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुस गावात वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तसेच नातेवाईक अशा तब्बल ११ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक मळमळ आणि उलट्या सुरू झाल्याने सर्वांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुस गाव हे पद्मावती देवीच्या नावाने प्रसिद्ध असून, येथील वांग्याची भाजीही परिसरात विशेष प्रसिद्ध आहे. गावातील रहिवासी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर तथा पत्रकार अशोक कचरे यांच्या वडिलांनी मुलगी घरी आली असल्याने काल बाजारातून वांगे विकत आणले. त्यापासून घरी भाजी तयार करण्यात आली.
रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास कचरे आणि आरसुडे कुटुंबातील सदस्यांनी ही भाजी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. परिस्थिती लक्षात येताच जवळपास १० ते ११ महिला-पुरुषांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
औषध फवारणीमुळे विषबाधा झाली का?
वांग्यांवर कोणत्याही प्रकारची औषध फवारणी करण्यात आली होती का, किंवा विषबाधेचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. वांग्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, पुस गावच्या वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर एकाच वेळी अनेक जण आजारी पडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत वांग्यामुळेच विषबाधा झाली, असे निश्चितपणे म्हणता येणार नाही.
विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे
- कुसुम कचरे
- रसिका कचरे
- श्रेयस कचरे
- श्रेया कचरे
- त्र्यंबक कचरे
- स्वप्निल कचरे
- ईश्वर कचरे
- सुनंदा आगरकर
- श्रेया आगरकर
- आशा आरसुडे
- अनन्या आरसुडे
सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
No Comment! Be the first one.