आ. श्रीजया चव्हाण यांनी पीडित कुटुंबियांसह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे नांदेड
मुदखेड तालुक्यातील माळकोठा येथील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी आज पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्याकडे केली. याप्रसंगी चंद्रकांत शिंदे यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या भेटीमध्ये मृतक चंद्रकांत शिंदे यांची आई सर्जाबाई शिंदे आणि मुलगी रूपाली यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलीस अधीक्षकांसमोर कथन केला. संबंधित आरोपींवर हत्येचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी मांडली. त्यानंतर आ. श्रीजया चव्हाण यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी सदर प्रकरणी हत्येचे गुन्हे दाखल होत असल्याची माहिती दिली.
जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी अशा पद्धतीने तुघलकी कर्जवसुली करणे चुकीचे असून, त्यांना वेळीच आळा घालण्यात यावा, अशीही मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. तत्पूर्वी, दुपारच्या सुमारास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती घेतली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना केली.

No Comment! Be the first one.