वाळू तस्करांनी दोन ते तीन तास रोखल्याचा आरोप; पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पथकाची केली सुटका
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबेलवादे
पैठण येथे वाळूने भरलेल्या हायवा वाहनावर कारवाई करत असताना छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) पथकाला काही वाळू तस्करांनी घेराव घातल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओच्या पथकाने पैठण येथील संजय ऑटो पेट्रोल पंपासमोर वाळूने भरलेली हायवा पकडून कारवाई सुरू केली होती. यावेळी काही जणांनी पथकाला घेराव घातल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांना जवळपास दोन ते तीन तास रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरटीओच्या पथकाची सुटका केली. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा दावा काही उपस्थित नागरिकांनी ‘लोकार्थ’शी बोलताना केला.
मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार का, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.