लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : कत्तलीच्या उद्देशाने बंद कंटेनरमधून क्रूरपणे कोंबून अवैध वाहतूक केली जात असलेल्या २९ गोवंशीय जनावरांची गुन्हे शाखेने सुटका केली. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात करण्यात आली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, सहा जणांविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाटा कंपनीचा बंद कंटेनर थांबवून तपासणी केली असता त्यात जनावरे दाटीवाटीने कोंबलेली आढळली. कंटेनरच्या नंबर प्लेटवरील नोंदणी क्रमांकातही खाडाखोड करून बनावटपणा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या कारवाईत कंटेनर, स्विफ्ट कार, मोबाईल आणि २९ गोवंशीय जनावरे असा एकूण ३० लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव आणि सहाय्यक आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
No Comment! Be the first one.