
टीम द – लोकार्थ | मुंबई – बीड जिल्ह्याचे माजी खासदार,माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या रुपाने मार्गदर्शक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले,अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
बबनराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून नेतृत्व केले होते. त्याचबरोबर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यात सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास या खात्यांचे मंत्री, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ऊसतोड कामगार,शेतकरी-कष्टकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. गोवा मुक्तीच्या चळवळीतही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले होते.
दि.28 ऑक्टोबर रोजी बबनराव ढाकणे यांच्या पार्थिवावर मूळगाव पागोरी-पिंपळगाव,ता.पाथर्डी, जि.अहनदनगर येथे अंत्यसंस्कार केले जातील. ऊसतोड कामगार, शेतकरी,कष्टकरी, बेरोजगार यांच्या प्रश्नांवर ते कायम आग्रही असायचे. त्यांच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली आहे,असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले आहे.