एस.एम. एजन्सीवर FDA ची कारवाई; ६२६ किलो मिरची व हळद पावडर जप्त
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कन्नड तालुक्यातील एस.एम. एजन्सीवर कारवाई करत ‘लाल हिना’ ब्रँडच्या २ लाख ९६ हजार ३८० रुपये किमतीच्या मिरची व हळद पावडरचा ६२६ किलो साठा जप्त केला. ही कारवाई २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
तपासणीदरम्यान विक्रीसाठी ठेवलेला संशयास्पद व भेसळीचा संशय असलेला साठा आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तो जप्त केला. यामध्ये २ लाख १३ हजार १८० रुपये किमतीची ४१८ किलो मिरची पावडर, तर ८३ हजार २०० रुपये किमतीची २०८ किलो हळद पावडरचा समावेश आहे.
एजन्सीच्या तपासणीत स्वच्छतेसाठी पुरेशी जागा नसणे, कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी न करणे आणि ग्राहकांच्या तक्रार निवारणाची व्यवस्था नसणे, अशा त्रुटी आढळल्या. अधिकृत तपासणीत प्रतिष्ठानाला ५२ पैकी ४० गुण मिळाले असून ते नियमपालनाच्या निकषांवर अपात्र ठरले.
जप्त केलेला संपूर्ण साठा सीलबंद करून पुढील आदेशापर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्यात आला आहे.


No Comment! Be the first one.