हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून अटक
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादाचा भडका उडून बाप-लेकाच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल कीर्तिकर यांची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेनंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयितांना रेल्वे स्टेशन परिसरातून काही तासांत ताब्यात घेण्यात आले. राजेंद्र गयचंद (वय ६०), मनोज गयचंद (वय २०), नागेश गयचंद (वय १८), मानसी गयचंद (वय २२) आणि छन्नो गयचंद (वय ५५), अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व मूळचे हरियाणातील असून सध्या रांजणगाव येथील एकतानगर परिसरात वास्तव्यास आहेत.
रागाने पाहण्यावरून वाद; दोन जीवांचा अंत!
एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यातून दोन्ही कुटुंबांमध्ये धुसफूस सुरू होती. सोमवारी मध्यरात्री एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून पुन्हा वाद उफाळला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाच जणांनी मिळून बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे. या घटनेत बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. किरकोळ वादातून थेट दुहेरी हत्याकांड घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त होत आहे.
हरियाणाला पळण्याचा डाव; पोलिसांनी रेल्वे परिसरात गाठले!
दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. आरोपी हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम राबवली आणि पाचही संशयितांना ताब्यात घेतले. गुन्ह्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना काही तासांत पकडण्यात आल्याने पोलिसांच्या कारवाईला महत्त्व आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची धडक
पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि छावणी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मजवर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने संशयितांचा माग काढला.
या पथकात PSI संजय जगताप, हेड कॉन्स्टेबल जालिंदर रंधे, योगेश शेळके, पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल, समाधान पाटील, नितीन इनामे, प्रकाश वाघ, राजू वाघ, वैभव गायकवाड, सचिन ठोकळ आणि दीपक जाधव यांनी सहभाग घेतला.
No Comment! Be the first one.