विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे निर्देश
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
सद्यस्थितीत महाराष्ट्रभर दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने यापुढे ग्रामपंचायतीला पाणीटंचाई चारा आणि शाळेतील सुविधांवर खर्च करावा लागणार असल्याच्या सूचना छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या आहेत.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर आयुक्त (स्थापना) दादासाहेब वानखेडे, सहाय्यक आयुक्त (विकास) डॉ. ज्ञानोबा मोकाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक डॉ. स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी पेन्शन अदालत, आश्वासित योजनांचा लाभ देणे, स्थायित्वाचा लाभ देणे, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारी निकाली काढणे, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढणे, घरकुल योजना, जल जीवन मिशन याबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने लावण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी करून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे कौतुकही यावेळी जी श्रीकांत यांनी केले.
पुढे बोलताना विभागीय आयुक्त जी श्रीकांत म्हणाले की, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ग्राम स्तरावर गावांना भेटी देऊन दुष्काळ नियंत्रणासाठी योग्य ते नियोजन करावे यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करावी अशा सूचना दिल्या. जलसंधारण आणि टंचाई निवारण मध्ये स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांचा सहभाग नोंदवावा असे आवाहन केले . ज्या ग्रामपंचायती मध्ये पाणीटंचाई, चारा प्रश्न आणि शाळेतील भौतिक सुविधांच्या अडचणी आहेत त्या सर्वप्रथम सोडाव्यात त्या शिवाय सदर गावात इतर कुठल्याही योजनेतील कामे करू नयेत.
गरजू शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह समारंभ पार पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे नियोजन तालुका किंवा गाव स्तरावर करण्या बाबत त्यांनी सूचित केले.
चौकट
अन्यथा कारवाई…
ज्या ग्रामपंचायती गावच्या गरजेनुसार आपला निधी पाणी पुरवठा, जलसंधारण आणि शालेय भौतिक सुविधा यावर खर्च करणार नाहीत त्या वर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
जी. श्रीकांत
विभागीय आयुक्त
छत्रपती संभाजीनगर

No Comment! Be the first one.