४,२२२ किलो गूळ, बडीशेप आणि स्पेशल सोफ सीलबंद; कोल्ड स्टोरेज तात्काळ बंद
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संशयास्पद अन्नसाठ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत धडक कारवाई केली. जाधववाडी परिसरातील मे. औरंगाबाद कोल्ड स्टोरेज एलएलपी (सर्व्हे क्रमांक ५) येथे छापा टाकून विना लेबल असलेला ४ हजार २२२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या मालाची एकूण किंमत २ लाख ९१ हजार ३३५ रुपये असून, संबंधित कोल्ड स्टोरेज विनापरवाना असल्याने ते तात्काळ बंद करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका एल. झाडे यांनी २१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला संशयास्पद आणि चुकीचे लेबल असलेला अन्नसाठा आढळून आला. यात ३ हजार ७४९ किलो खुला गूळ, २५ किलो बडीशेप आणि ‘न्यू बिग बॉस’ ब्रँडचा ४४८ किलो स्पेशल सोफ यांचा समावेश आहे.
जप्त केलेल्या मालामध्ये खुल्या गुळाची किंमत २ लाख ६ हजार १९५ रुपये, बडीशेपची किंमत ४ हजार ५०० रुपये, तर स्पेशल सोफची किंमत ८० हजार ६४० रुपये आहे. या तिन्ही पदार्थांची एकूण किंमत २ लाख ९१ हजार ३३५ रुपये आहे.
सदर अन्नपदार्थांची साठवणूक अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील कलम २३ आणि २६ चे उल्लंघन करून करण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. कारवाईदरम्यान संपूर्ण अन्नसाठा जागेवरच सीलबंद करण्यात आला. हा माल कोल्ड स्टोरेजच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत त्याची विल्हेवाट लावणे किंवा सीलशी छेडछाड करण्यास मनाई करण्यात आली आहे.


No Comment! Be the first one.