पाशांकुशा एकादशीला नाथांच्या दारी वारकऱ्यांचा महापूर….
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे, पैठण
पाशांकुशा एकादशीच्या वारीनिमित्त गुरुवारी पैठणनगरी “भानुदास एकनाथ”च्या जयघोषाने दुमदुमून गेली. हजारो भाविकांनी श्रीसंत एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली महिन्याची वारी पूर्ण केली.
या वारीनिमित्त नाथांच्या समाधी मंदिराला मोसंबीचा आरसा लावून विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरातील ही सजावट भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
वारकरी संप्रदायात अश्विन महिन्यातील पाशांकुशा एकादशीच्या वारीला मोठे महत्त्व आहे. पंढरपूर येथे विठुरायाच्या भेटीला जाऊ न शकलेल्या वारकरी भाविकांनी नित्यनियमाने गुरुवारी पहाटेपासूनच मिळेल त्या वाहनाने पैठण गाठले. पवित्र गोदावरीत स्नान करून, टाळ-मृदंगाच्या तालावर फुगड्या खेळत आणि हरिनामाचा गजर करत भाविक तल्लीन झाले होते. नाथांच्या गावातील मंदिर व समाधी मंदिरात दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
पहाटे नाथवंशजांच्या हस्ते मंदिरात नित्य अभिषेक करून मोठ्या उत्साहात काकडा आरती साजरी करण्यात आली. यावेळी हजारो वारकरी भाविकांनी नाथांच्या समाधीवर पुष्पवर्षा केली.
मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार विलास बापू भुमरे व कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या सेवेकऱ्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना भगर-आमटी महाप्रसादाचे वाटप केले. गर्दीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
एकादशीनिमित्त रात्री भजन व भारूडाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर केला जातो. यावेळी महाराष्ट्रातील विविध नामवंत महाराज मंडळी व महंत नाथांसमोर आपली सेवा सादर करून रात्रभर जागर करतात.
No Comment! Be the first one.