तुळजापुरात ५१० किलो भेसळयुक्त खवा-पेढे जप्त; बनावट मिठाईचा साठा नष्ट
लोकार्थ प्रतिनिधी
तुळजापूर : नवरात्रोत्सवात श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापुरात दाखल होत असताना, दुसरीकडे मिठाईच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत तब्बल ५१० किलो संशयास्पद खवा, पेढे आणि बनावट मिठाईचा साठा जप्त करून अथवा नष्ट केला. खव्याच्या नावाखाली भेसळयुक्त माल, तर अस्सल पेढ्यांच्या नावाखाली पाम ऑइल आणि वनस्पती तेलापासून तयार केलेली मिठाई विकली जात असल्याचे तपासणीत समोर आले.
‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी तीन भट्ट्यांची तपासणी करून आठ नमुने घेण्यात आले. यावेळी २३६ किलो खवा, २८ किलो कंदी पेढे, २८ किलो साधे पेढे आणि १३ किलो केशर पेढे जप्त करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पाच अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी २१० किलो संशयास्पद कलाकंद आणि पेढ्यांचा साठा नष्ट करण्यात आला.
पेढ्यांच्या नावाखाली तेलकट मिठाई!
तपासणीदरम्यान काही पेढे आणि कलाकंद अस्सल खव्यापासून तयार केलेले नसून पाम ऑइल, वनस्पती तेल आणि बिगर-दुग्धजन्य घटकांपासून बनविल्याचा संशय आढळला. हे पदार्थ चुरगळल्यानंतर बोटांना तीव्र तेलकटपणा आणि चिकटपणा जाणवत होता. उत्पादकाचे नाव, घटक आणि तारीख यांसारख्या आवश्यक माहितीचे लेबल नसणे, तसेच अधिकृत खरेदी-विक्री बिलांचा अभाव यांसारख्या बाबीही निदर्शनास आल्या.
देवीच्या दर्शनासाठी दूरदूरून येणाऱ्या भाविकांना शुद्ध मिठाई मिळावी, यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३८(४) नुसार संबंधित व्यावसायिकांच्या संमतीने माल नष्ट करण्यात आला. विनानोंदणी व्यवसाय करणाऱ्या संबंधित व्यावसायिकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली.
No Comment! Be the first one.