सील तोडून टँकरमधून गॅस चोरी; ४६ भरलेले-रिकामे व्यावसायिक सिलिंडर आणि ३५.९५ लाखांचा टँकर जप्त
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : दसऱ्याच्या दिवशी गंगापूर तालुक्यातील रांजणगाव पोळ शिवारात एलपीजी गॅस टँकरची सील तोडून त्यातील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून चोरी करण्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजी नगर वैजापूर रोडवरील पोळ रांजणगाव शिवारात फौजी ढाब्याजवळ १८ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ११.२० वाजता पुरवठा विभाग आणि शिल्लेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत गॅसने भरलेला टँकर, व्यावसायिक वापराचे भरलेले व रिकामे सिलिंडर, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे असा एकूण ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी टँकर चालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टँकरची सील तोडून गॅस भरण्याचा प्रकार
पुरवठा निरीक्षक अमोल वसंत कासार यांना १८ ऑक्टोबर रोजी रात्री तहसीलदारांकडून रांजणगाव पोळ शिवारात एलपीजी गॅसचा गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शिल्लेगाव पोलिसांचे कर्मचारी योगेश हरणे आणि त्यांच्या पथकानेही कारवाईत सहभाग घेतला.
घटनास्थळी एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरमधून रबरी पाइपच्या साहाय्याने सिलिंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पथकाला पाहून एक जण पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर टँकरची आणि परिसराची तपासणी केली असता, १९ किलो वजनाचे सहा भरलेले व ४० रिकामे व्यावसायिक सिलिंडर, तसेच पाच किलो वजनाचे २३ रिकामे सिलिंडर आढळले. गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन नोजल आणि रबरी पाइपही जप्त करण्यात आले.
टँकरची सील तुटलेली; ११ हजार ७२० किलो गॅसचा साठा
कारवाईदरम्यान एमएच ०४ एमआर ३०६९ क्रमांकाचा टँकर ताब्यात घेण्यात आला. संबंधित कागदपत्रांची तपासणी केली असता, टँकरमध्ये सुमारे ११ हजार ७२० किलो एलपीजी गॅस असल्याचे बिलिंग दस्तऐवजांतून समोर आले. हा टँकर मुंबईतील एजिस लॉजिस्टिक लिमिटेड येथून वाळूज एमआयडीसीतील रुबिकॉन फॉर्म्युलेशन्स प्रा. लि. येथे जाणार असल्याचे कागदपत्रांत नमूद होते. मात्र, तपासणीदरम्यान टँकरची सील तुटलेली आढळल्याने संशय अधिक बळावला.
प्रत्येक सिलिंडरमागे ८०० रुपये?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक संजय दत्तात्रय खंडागळे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने पप्पू कऱ्हाळे याच्या सांगण्यावरून टँकर संबंधित ठिकाणी आणत असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. गॅस भरून दिलेल्या प्रत्येक सिलिंडरमागे ८०० रुपये मिळत असल्याचेही त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रत्येक वेळी सहा व्यावसायिक सिलिंडर भरून दिले जात असल्याची माहितीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात नेवासा येथील पप्पू कऱ्हाळे, बिहार येथील मिथिलेशकुमार आणि रांजणगाव पोळ येथील जागामालक रुस्तुम ओंकार गुंजाळ यांची नावेही तक्रारीत नमूद आहेत. या सर्वांनी संगनमताने गॅस चोरीचा प्रकार केल्याचा आरोप असून, त्याची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
४९ लाखांचा मुद्देमाल जप्त
कारवाईत ३५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा टँकर, त्यातील गॅसचा अंदाजे १२ लाख ८ हजार ३३२ रुपयांचा साठा, सिलिंडर आणि गॅस भरण्याची उपकरणे असा एकूण ४९ लाख ३५ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टँकरची सील तोडून गॅस काढणे आणि तो सिलिंडरमध्ये भरणे हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाई
पुरवठा निरीक्षक अमोल कासार यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक संजय दत्तात्रय खंडागळे, पप्पू कऱ्हाळे, मिथिलेशकुमार आणि जागामालक रुस्तुम ओंकार गुंजाळ यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील कलम ३ व ७, एलपीजी पुरवठा व वितरण आदेश २००० मधील संबंधित तरतुदी आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास शिल्लेगाव पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत.


No Comment! Be the first one.