तीन लाख पाच हजारांहून अधिक किमतीचे तेल जप्त; गंभीर त्रुटींमुळे अन्न व्यवसायाचा परवाना निलंबित
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजाळे
नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. देगलूर तालुक्यातील एमआयडीसी खानापूर येथील एका तेल उत्पादक आस्थापनेतून भेसळीचा संशय असलेले एक हजार ५२८ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
या तेलाची किंमत तीन लाख पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आहे.
मे. उमेश अग्रो इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी केली असता, ‘वारुणी गोल्ड’ या ब्रँडचे रिफाइंड सोयाबीन तेल संशयास्पद आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा साठा जप्त केला.
तपासणीदरम्यान आस्थापनेत स्वतःची प्रयोगशाळा नसल्याचे आणि इतर गंभीर त्रुटी आढळून आल्या. यामुळे प्रशासनाने संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार, नांदेड परिमंडळ दोनचे सहायक आयुक्त आर. एम. भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. एस. लोंढे यांनी केली.
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No Comment! Be the first one.