सदरमधील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; तीन तरुणींची सुटका, एकाला अटक
लोकार्थ प्रतिनिधी विक्रम खाडे
नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपराजधानीतील पॉश आणि संवेदनशील सदर परिसरात सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
सदर येथील अचरज टॉवरमधील ‘ग्रेप्स स्पा अँड सलून’मध्ये स्पा आणि मसाजच्या नावाखाली अवैध देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून, ग्राहकांची व्यवस्था पाहणाऱ्या स्पा कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हार्दिक नितीन नागपुरे असे आहे.
दरम्यान, स्पाची संचालिका गुंजन आसरे आणि व्यवस्थापक अन्नू जहीर हे कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या दोघांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

No Comment! Be the first one.