धुळे-सोलापूर महामार्गावरील मलकापूर शिवारात भीषण अपघात; दोघे जखमी, चिंचोली गावावर शोककळा
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. खुलताबाद) शिवारात रस्त्याच्या कडेला नादुरुस्त झालेल्या पिकअपचे टायर बदलत असताना भरधाव कारने पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आकाश पुंजाराम सातदिवे (वय २६, रा. चिंचोली, ता. खुलताबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे चिंचोली गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील आकाश सातदिवे, हिरालाल कचरू सातदिवे (वय ५०) आणि ज्ञानेश्वर बळवंत बोडके (वय ३८) हे तिघे पिकअप वाहनातून (एमएच २० जीसी २३३४) सोयाबीन घेऊन लासूर स्टेशन येथील बाजारपेठेत जात होते. दरम्यान, मलकापूर शिवारात महामार्गावर त्यांचे पिकअप वाहन नादुरुस्त झाले. त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून टायर बदलण्यास सुरुवात केली.
याचवेळी वेरूळकडून पाचपीरवाडी फाट्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच ५७, १३१३) पिकअपला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, आकाश सातदिवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर हिरालाल सातदिवे आणि ज्ञानेश्वर बोडके हे दोघे जखमी झाले.
महामार्ग पोलिसांची तातडीने धाव
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, खुलताबाद येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या झिरपे, हवालदार विनोद तांगडे, शरद दळवी आणि शांताराम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत आकाश आणि जखमी दोघांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूकही सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद बिघोत पुढील तपास करीत आहेत.
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
आकाश सातदिवे हा पुंजाराम सातदिवे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो आई-वडिलांना शेतीकामात मदत करीत असे. अचानक झालेल्या अपघातात एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने सातदिवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आकाशच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
वेरूळ येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. आकाशवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


No Comment! Be the first one.