महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र, ताडकळस यांच्या पुढाकाराने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, शिरकळस यांच्या वतीने उपप्रकल्प धान्य संकलन व विक्री केंद्राचा उद्घाटन शुक्रवारी शिरकळस येथे झाले.
माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती जया नेमाने , लेखा अधिकारी धनंजय कुलकर्णी, जिल्हा उपजीविका सल्लागार शरद कटारे, उत्कर्ष च्या अध्यक्षा श्रीमती शोभा राऊत, व्यवस्थापक श्रीमती गंगासागर भराड तसेच सरपंच मीरा माणिकराव भोसले यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन गंगासागर भराड यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. शरद कटारे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिला बचत गटांचे संघटन, आर्थिक स्वावलंबन, उद्योजकता विकास आणि शेतीमालाच्या संकलन व विक्री व्यवस्थेचे महत्त्व विशद केले.
ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, शेतमाल व धान्य संकलनासाठी संघटित व्यवस्था निर्माण करणे आणि महिलांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. धान्य संकलन व विक्री केंद्रामुळे महिला बचत गटांना व्यवसायाची नवी दिशा मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे..

No Comment! Be the first one.