लोकार्थ प्रतिनिधी सेलू
पुनमचंद खोना
नवरात्रीच्या काळात सेलू शहरात साजरा होणारा गरबा आणि दांडिया महोत्सव हा केवळ नाच नसून संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक मेळाव्याचा एक मोठा सोहळा आहे. गुजराती आणि कच्छी समाजात गरबो आणि दांडियाचं नातं हे भक्तीचं नातं मानलं जातं.
गुजराती समाजाचा इतिहास (१८५० ते १९५०)
सेलू मधील गुजराती समाजाचा इतिहास हा या शहराच्या व्यापारी इतिहासाशी जोडलेला आहे. सेलू आधी हैदराबादच्या निजामाच्या राज्यात होते. निजामाच्या काळात मराठवाड्यात कापूस, ज्वारी आणि तेलबियांचे प्रचंड उत्पादन व्हायचे आणि तो माल मुंबई-गुजरातला जात होता.
सेलू हे तेव्हा बाजारपेठेचे गाव होते, इथे कापूस जिनिंग आणि धान्याची मोठी आवक होती. निजाम गेला आणि महाराष्ट्र झाला, सेलू तालुका झाला तेव्हा याच परिवारांनी जिनिंग, प्रेसिंग, किराणा होलसेल आणि मशिनरी यात मोठे नाव केले.
सेलूची खासियत म्हणजे इथल्या गुजराती लोकांनी कधीच गाव सोडले नाही. पश्चिम कच्छमध्ये दुष्काळ पडायचा तेव्हा व्यापारासाठी अनेक गुजराती परिवार रेल्वेने मुंबई-मनमाड-परभणी मार्गे सेलूत आले आणि इथेच स्थायिक झाले.
परभणी जिल्ह्यातील मोठे व्यापारी शहर म्हणून सेलूमध्ये गुजराती समाज खूप जुना आहे, पण संख्या कमी आहे. त्याकाळी साधारण १५० गुजराती कुटुंबे होती. हे सगळे मुख्यत्वे व्यापारी आहेत. यात खोना, शहा, पटेल, कलावडिया, रूपडा, काला, गौरी, मेहता, लोडाया, राणा, व्यास, मोमाया, कटारमल,पारीकचंद्रहास पटेल,बी.बी.पटेल यांसारखी परिवार आजीपासून नातवापर्यंत एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घेतात.
समाज रचना आणि कुलदेवी
सेलू मधील जवळपास सर्व कच्छी लोहाणा, भानुशाली, घोसर समाजाची कुलदेवी एकच आहे – श्री आशापुरा माता. सर्व समाज गुजराती समाज मंडळ अंतर्गत जोडलेला आहे. दिवाळी, अन्नकूट, नवरात्री यावेळी एकत्र सामूहिक भोजन होते.
या समाजाची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते १००% शाकाहारी आहेत आणि मराठी भाषा उत्तम बोलतात. इथे ३-४ पिढ्यांपासून राहत असल्याने ते पूर्णपणे मराठवाडी झाले आहेत, पण घरी अजूनही गुजराती / कच्छी भाषा बोलली जाते.
पारंपारिक गरबा आणि दांडिया सादरीकरण
सेलू मध्ये गरबा-दांडिया हा मोठ्या शहरांसारखा कमर्शियल DJ वाला नसून एकदम पारंपारिक पद्धतीने साजरा होतो. इथे गुजराती समाज कमी असला तरी सर्व महिला एकत्र येऊन उत्सव साजरा करतात.
मुख्य ठिकाण: साईबाबा मंदिर, महेश नगर आणि इतर दुर्गा मंडप. पंडालच्या मध्यभागी देवीची मूर्ती आणि मध्यभागी लावलेला गरबो (छिद्रे असलेल्या मडक्यातील अखंड दिवा) असतो. झेंडूच्या माळा आणि लाइटिंग लावून मांडव सजवला जातो.
पारंपारिक क्रम आजही पाळला जातो:
१. मध्यभागी मातीच्या मडक्यात अखंड दिवा – यालाच ‘गरबो’ म्हणतात, यात देवीचा वास असतो.
२. संध्याकाळी देवीची आरती – जय आद्या शक्ती आरती आणि देवीची स्तुती गायली जाते.
३. महिला गोल करून धीम्या टाळीवर भजन गातात – याला बैठा गरबा म्हणतात.
४. दोन टाळी (बे ताली), तीन टाळी (त्रण ताली) वर उभा गरबा करत गोल फिरतात.
५. शेवटी दोन काठ्यांनी पार्टनर बदलत दांडिया रास खेळला जातो.
यात बॉलिवूड गाणी अजिबात नसतात, फक्त देवीची भजने – पंखिडा, कुमकुम ना पगला वगैरेच असतात. लहान मुलांपासून आजीपर्यंत सगळे एकत्र येतात, महिलांची संख्या जास्त असते. महिला नऊवारी साडी आणि कच्छी भरतकामाच्या ड्रेसमध्ये रात्री १० ते ११ पर्यंत गरबा खेळतात.
अशा प्रकारे जुन्या पिढीसोबत नवीन पिढी ही ८० वर्षांची परंपरा पुढे घेऊन जात आहे.

No Comment! Be the first one.