लोणीकर पिता-पुत्रांना रेल्वेच्या कार्यक्रमात डावल्याने भाजपा कार्यकर्त्यात संतप्त रोष.
लोकार्थ..
संतप्त भाजपा कार्यकर्त्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया
रेल्वे खात्याने तयार केलेल्या फलकावर लोणीकर पिता-पुत्रांना डावलून इतर सर्व लोकप्रतिनिधिची नावे लिहिण्यात आली. पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादीचे राजेश टोपे,भाजपचे संतोष दानवे, नारायण कुचे यांचा समावेश
रेल्वे खात्याच्या कार्यक्रमात आमदार लोणीकर यांना डावल्याने आमदार बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांत रोष निर्माण झाला असून समाजमाध्यमात नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकाच घरात राहणाऱ्या सख्ख्या भावाचे, वडिल-मुलांचे एकमेकांशी पटत नाही, तिथे राजकारणातील जीवघेण्या स्पर्धेत एकाच पक्षातील नेत्यांचे पटेल अशी अपेक्षा करणेही चुकीचेच. म्हणून राज्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात एकाच पक्षात असूनही दोन दिशेला तोंड असणाऱ्या नेत्यांची काही कमी नाही. यापैकीच एक म्हणजे जालन्याचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री परतूरचे आमदार बबनराव लोणीकर. या दोन्ही नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. जिल्ह्यात अनेकदा याचा अनुभव त्यांच्या समर्थकांना येत असतो. त्यामुळे संधी मिळेत तेव्हा हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या खात्याच्या कार्यक्रमातून असेच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना बेदखल करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
रविवार, दि. १५ रोजी जालना येथे संपन्न झालेल्या रेल्वेच्या कार्यक्रमात मानापमान नाट्याचा ताजा अंक जालनेकरांना बघायला मिळाला. मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रगतीपथावर आहे. जालना येथील विद्युतीकरण पुर्ण झाल्यामुळे जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जनशताब्दी एक्सप्रेस विद्युत इंजिनद्वारे धावण्यास सज्ज झाली.
यासाठी रेल्वे खात्याने तयार केलेल्या फलकावर सर्व लोकप्रतिनिधिची नावे लिहिण्यात आली. पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव, पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, राष्ट्रवादीचे राजेश टोपे,भाजपचे संतोष दानवे, नारायण कुचे यांचा समावेश आहे. मात्र परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे नाव वगळण्यात आले. विशेष म्हणजे आमदार लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. असे असतानाही लोणीकर यांचे नाव टाळण्यात आले. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्या समर्थकांत रोष निर्माण झाला असून समाजमाध्यमात उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. जालना जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात रावसाहेब दानवे व आमदार बबन लोणीकर यांच्यातील राजकीय वर्चस्वातील स्पर्धा अनेक वर्षांपासून चालू आहे. पक्षाच्या बैठका तसेच सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मानापमान नाट्य नेहमीच रंगत असते. रेल्वे खात्याच्या कार्यक्रमानिमित्त दानवे-लोणीकर यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला.
