विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : टीव्ही सेंटर चौकात दारू पिताना झालेल्या वादातून दिव्यांग भिक्षेकऱ्याची स्टीलच्या वॉकरने डोक्यात वार करून हत्या करणाऱ्या संशयित आरोपी अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (वय २३, रा. रशीदपुरा) याला शहर गुन्हे शाखेने गणेशा कॉलनी परिसरातून अटक केली. रविवारी (६ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर ही निघृण हत्या घडली होती.
मृत व्यक्ती गेल्या अनेक महिन्यांपासून टीव्ही सेंटर परिसरात राहत होता. मिळेल ते खाऊन आणि रात्री उशिरापर्यंत पडवीपणाचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. त्याचे वय अंदाजे ४५ ते ५५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच शरीरावरही जखमा आढळून आल्या.
घटनेनंतर सिडको पोलिसांकडून तपास सुरू असताना शहर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अकबर पठाण याला ताब्यात घेतले. पुढील तपासात हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा उलगडा होणार आहे.


No Comment! Be the first one.