लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
नांदेड : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. मुंबई दक्षता विभागाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १५ ऑक्टोबर रोजी तीन कारखान्यांवर छापे टाकून मिरची पावडर, हळद पावडर आणि खाद्य मिठाचा एकूण २५ हजार ७६८ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत २८ लाख ९७ हजार ८१२ रुपये आहे.
या कारवाईत आनंद फूड प्रॉडक्ट, जनता इंडस्ट्रीज आणि श्री गणेश मिरची कांडप केंद्र या तीन आस्थापनांचा समावेश आहे. जप्त केलेल्या साठ्यात खुली मिरची पावडर, हळद पावडर तसेच भेसळयुक्त असल्याचा संशय असलेल्या खाद्य मिठाचा समावेश आहे. हे पदार्थ निकृष्ट दर्जाचे असण्याची आणि मानवी आरोग्यास घातक ठरण्याची शक्यता असल्याने अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
प्रशासनाने तिन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी ए. एम. तम्मदवार, वाय. डी. चिभडे, एस. व्ही. कानकावाड आणि ए. के. दुधते यांच्या पथकाने केली. छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहआयुक्त एस. आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड-२ चे सहाय्यक आयुक्त आर. एम. भरकड यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली.

No Comment! Be the first one.