लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : स्टील आणि सिमेंट खरेदीच्या व्यवहारातून वेदांतनगर येथील व्यावसायिकाची १ कोटी ९१ लाख १२ हजार ७५६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक आणि गुजरात येथील दोघांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विशाल जेथलिया यांच्याकडून ३० मे २०२१ ते ९ जून २०२६ या कालावधीत स्कायलॉन इंडिया प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी २ कोटी ६५ लाख ६२ हजार ७५५ रुपयांचे स्टील व सिमेंट खरेदी केले. त्यापैकी ७४ लाख ५० हजार रुपये अदा करण्यात आले. उर्वरित रकमेसाठी गुजरातमधील तीन शटर विक्रीचा करार करण्यात आला; मात्र त्याचा ताबा आणि खरेदीखत देण्यात आले नाही.
तसेच, सटाणा येथील साईटवरील ग्रेडर मशीन आणि आरएमसी प्लांट विक्रीचा नोटरी करार करूनही संबंधित यंत्रांचा ताबा फिर्यादीला न देता ते परस्पर दुसऱ्याला विकल्याचा आरोप आहे. यातून १ कोटी ९१ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी भालचंद्र मुरलीधर काकुळते (रा. नाशिक) आणि प्रवीण पटेल (रा. गांधीनगर, गुजरात) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(२), ३१६(५), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे पुढील तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.