पोलिसांची धडक कारवाई; सांगवी शिवारात गांजाच्या शेतीचा पर्दाफाश
लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे लातूर
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील सांगवी घुगी येथील शेतात उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरूर अनंतपाळ पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री धडक कारवाई करत गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईत ६ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना सांगवी घुगी येथील एका शेतात उसाच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे चाकूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अक्षय जाधव यांच्या पथकाने संबंधित शेतात छापा टाकला.
रविवारी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान उसाच्या फडात गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही झाडे जप्त करून पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
या कारवाईदरम्यान पंचांसह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गांजासारख्या अंमली पदार्थाची शेती केल्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच गांजाची विक्री कुठे केली जाणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.
कारवाईत विविध विभागांचा सहभाग
या मोहिमेत पोलीस पथकासोबत महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. प्रयोगशाळा तंत्रज्ञ अविनाश दपाटे आणि सहाय्यक पायल शर्मा यांनी तांत्रिक मदत केली. तसेच तहसीलदार गोरखनाथ पदकोडे, मंडळ अधिकारी नवनाथ खंडाडे, ग्राममहसूल अधिकारी विकास शिनगारे, मारोती कुंभार, नितीन चिटमले यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजीराज बनसोडे आणि बाबासाहेब जगताप उपस्थित होते.
या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, गांजाची लागवड, त्यामागील उद्देश आणि संभाव्य विक्रीसाखळी याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

No Comment! Be the first one.