बाईक रॅलीतून तरुणांची उपस्थिती; मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
राज्यात विविध राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्यांचे आयोजन होत असताना, बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे पारंपरिक दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या एकजुटीचे आणि आरक्षणाच्या लढ्याचे केंद्र ठरलेल्या नारायणगडावरील या मेळाव्यासाठी पैठण तालुक्यातून हजारो मराठा बांधव सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
नारायणगडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जिल्ह्यातील ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांवर विचारमंथन, समाजबांधवांची एकजूट आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नारायणगडाचे प्रमुख ह.भ.प. महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गड परिसरात तयारीला वेग आला आहे. सेवेकऱ्यांकडून परिसराची स्वच्छता तसेच येणाऱ्या समाजबांधवांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहावेत, यासाठी विविध गावांतील महिलांनीही पुढाकार घेतला आहे. गावोगावी साखर वाटप आणि दवंडीच्या माध्यमातून मेळाव्याचे निमंत्रण दिले जात आहे. मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता नारायणगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी पैठण तालुक्यातील हजारो तरुण बाईक रॅलीच्या माध्यमातून सहभागी होण्याचे नियोजन करत आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकणे, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरील त्यांची भूमिका जाणून घेणे आणि दसऱ्यानिमित्त समाजबांधवांना शुभेच्छा देणे, हा या सहभागामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत, साईनाथ कर्डिले, रामेश्वर बावणे आणि सुभाष नवथर यांनी याबाबत माहिती दिली.
राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव नारायणगडावर येण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापन समितीने वाहतुकीसाठी येण्या-जाण्याचे मार्ग निश्चित केले आहेत. तसेच पिण्याचे पाणी आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या वतीने प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.
जरांगेंची भूमिका काय असणार?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळाव्यात काय भूमिका मांडणार, आरक्षणाच्या पुढील लढ्याची दिशा काय असेल आणि यावेळी काही नवीन घोषणा होणार का, याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मराठा समाजाला कोणता संदेश दिला जातो आणि पुढील आंदोलनाची दिशा काय ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
No Comment! Be the first one.