मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख १ हजार १११ रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या संकटात सामाजिक बांधिलकीचा हात
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
गंगापूर : पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, चारा टंचाई आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गंगापूरचे माजी नगराध्यक्ष तथा युवा नेते प्रदीप भैय्या पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस २ लाख १ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या बळीराजाच्या मदतीसाठी पुढाकार घेत त्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे.
गंगापूर तहसील कार्यालयात तहसीलदार नवनाथ वाघवाड यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी पुढे येण्याचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला.
शेतकऱ्यांच्या संकटात मदतीचा हात
यंदाच्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, शेतीचा वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. प्रदीप भैय्या पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दिलेली मदत ही संकटाच्या काळात सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न मानला जात आहे.
गोरक्षणासह रुग्णसेवेचाही उपक्रम
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धनादेश देण्यासोबतच प्रदीप पाटील यांनी गोशाळेत गाईंना हिरवा चारा वाटप केला. त्यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना फळांचे वाटप केले. सामाजिक सेवेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचा संदेश त्यांनी या उपक्रमातून दिला.
यावेळी नगरसेवक दीपक साळवे, भाग्येश गंगवाल, विजय पानखडे, राजेंद्र राठोड, प्रदीप राजपूत, नितीन पदार, गणेश मनाळ, शिवराज दारुंटे, रामनाथ शिंदे, रामेश्वर पाटील, पप्पू पाटील, बंटी पाटील, मुन्ना पाटील, शिवाजी पाहुणे, बाळू राजपूत, बाळू तोडगिले, बाबासाहेब वराडे, दादा गुडदे, अमोल साळवे, अशोक पाटील, अॅड. किशोर कराळे, बाबू शेठ ब्रेडवाले, सुदाम भडके, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर सवयी, प्रदीप वंजारे, कैलास साबणे, सत्यम तुपे, अमोल कळसकर, सचिन चिंतामणी, रईस भाई, भारत पाटील आणि संतोष काळे यांच्यासह कार्यकर्ते व मित्रपरिवार उपस्थित होता.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलेल्या योगदानासह गोरक्षण आणि रुग्णसेवेच्या उपक्रमाची गंगापूर परिसरात चर्चा होत आहे.
No Comment! Be the first one.