लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल जवळा बाजार
हिंगोली – वाढती महागाई आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडत असताना, ग्रामीण भागातील महिला बचत गट स्वावलंबनाचा मार्ग शोधत आहेत. घरगुती कामे सांभाळून जवळाबाजार येथील राजलक्ष्मी महिला बचत गटाच्या महिलांनी आकर्षक आकाशकंदील तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. कमी किमतीत आणि ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे हे आकाशकंदील बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राजलक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सपना बबनराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दहा महिला सदस्य कार्यरत आहेत. या गटातील सपना बबनराव सोनवणे, दीपली अशोक नाईकनवरे आणि रोहिणी कमलाकर जाधव या महिलांनी एकत्र येऊन गेल्या दोन महिन्यांपासून आकाशकंदील तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
दिवाळीच्या काळात घराघरांत आकाशकंदील लावण्याची परंपरा आहे. ही मागणी लक्षात घेऊन महिलांनी विविध आकारांचे आणि आकर्षक सजावट असलेले आकाशकंदील तयार केले आहेत. विशेष म्हणजे, या बचत गटाने प्रथमच आकाशकंदील निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या या आकाशकंदिलांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
महिला बचत गटांच्या माध्यमातून पापड, लोणची, मसाले, फराळाचे पदार्थ यांसह विविध वस्तूंची निर्मिती आणि विक्री केली जाते. अशा उपक्रमांमुळे महिलांना रोजगार मिळतो आणि कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालता येते. राजलक्ष्मी महिला बचत गटाचा आकाशकंदील निर्मितीचा उपक्रमही महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देणारा आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारा ठरत आहे.
No Comment! Be the first one.