तापमानवाढीमुळे बाजारपेठेत नारळपाण्याची विक्री तेजीत; रुग्णांना भेटायला जातानाही फळांऐवजी नारळपाण्याला पसंती
लोकार्थ प्रतिनिधी अनिल पोरवाल
जवळाबाजार : दिवाळीपूर्वीच तापमानात वाढ जाणवू लागल्याने शरीराला थंडावा आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नागरिकांकडून नारळपाण्याला मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे जवळाबाजारसह परिसरातील बाजारपेठेत नारळपाण्याची मागणी वाढली असून, बाराही महिने नारळपाण्याची विक्री होताना दिसत आहे.
नारळपाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यासोबतच वर्षभर आरोग्यासाठी नारळपाण्याचे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. पोटदुखी, गॅस तसेच शरीरातील पाण्याची कमतरता अशा तक्रारींमध्येही नारळपाणी उपयुक्त ठरत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. त्याचबरोबर त्यातील नैसर्गिक घटकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असा समज असल्याने आरोग्याबाबत जागरूक नागरिकांकडूनही त्याला पसंती मिळत आहे.
पूर्वी रुग्णालयात रुग्णाला भेटायला जाताना फळे घेऊन जाण्याची प्रथा होती. मात्र, आता फळांसोबत किंवा त्याऐवजी नारळपाणी घेऊन जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारळपाणी दिले जात असल्याने रुग्णालयांच्या परिसरात नारळपाणी विक्रीचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
नारळपाणी तुलनेने परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळत आहे. मागणी वाढल्यामुळे किरकोळ दरात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी आरोग्यासाठी उपयुक्त मानले जात असल्याने ग्राहकांकडून नारळपाणी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
आरोग्याची काळजी घेणाऱ्या नागरिकांपासून रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत नारळपाण्याची मागणी वाढत असल्याने बाजारपेठेत त्याची विक्री सध्या चांगलीच तेजीत आली आहे.
No Comment! Be the first one.