अस्वच्छतेचा कळस! हळदीच्या ढिगाऱ्यावरून कामगारांचा वावर; उत्पादन युनिट बंद
हिंगोली : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सोमठाणा कुरुंदा येथील मे. बसमत ॲग्रो व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. या हळद प्रक्रिया कारखान्यावर धडक कारवाई केली. कारखान्यात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने उत्पादन युनिट बंद करण्यात आले. यावेळी २१ हजार ९१५ किलो साबुत हळद, ज्याची किंमत ४३ लाख ८३ हजार ५० रुपये आहे, असा साठा जप्त करण्यात आला.
२२ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत कारखान्यातील अस्वच्छतेचे धक्कादायक प्रकार समोर आले. कामगार हळदीच्या ढिगाऱ्यावरून चालताना आणि पायाने हळद गोळा करताना आढळले. कामगारांनी ॲप्रन, हातमोजे, डोक्यावरील संरक्षक आवरण आणि सुरक्षित पादत्राणे वापरली नव्हती. तसेच कारखान्याच्या आवारात व भिंतींवर कबुतरांची विष्ठा, घरटी आणि घाण आढळल्याने हळद दूषित होण्याचा धोका निर्माण झाला होता.
हळदीच्या खरेदी-विक्रीची बिले आणि अधिकृत नोंदी उपलब्ध नव्हत्या. कामगारांच्या वार्षिक वैद्यकीय तपासणी व लसीकरणाचे पुरावेही आढळले नाहीत. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत कारखान्याला ७६ पैकी केवळ २४ गुण मिळाले.
अन्न सुरक्षा अधिकारी तुषार एस. घोपे यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ मधील कलम ३८(१)(सी) अन्वये कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या हळदीच्या ४८७ गोण्या सील करण्यात आल्या असून, पुढील आदेशापर्यंत साठा हलविण्यास किंवा विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.