पैठण तालुक्यात आठवडी बाजार सुरूच; दारू विक्रीही सर्रास सुरू असल्याचे चित्र
लोकार्थ रिपोर्ट | चंद्रकांत अंबिलवादे | पैठण | दि. २३
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार तसेच दारू विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आदेश दिले होते. मात्र, पैठण तालुक्यात या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. मतदान सुरू असतानाही काही भागांत आठवडी बाजार आणि दारू विक्री सुरू असल्याने प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी दि. २३ रोजी पैठण तालुक्यातील बिडकीन, निलजगाव, आडुळ, बालानगर, ढोरकीन, लोहगाव, पिंपळवाडी पिं., पाचोड, नांदर, आपेगाव, विहामांडवा यासह पैठण येथील एकूण १७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पैठण तहसील कार्यालयाला मतदानाच्या दिवशी मतदानाच्या वेळेत आठवडी बाजार तसेच दारू विक्री बंद ठेवण्याबाबत आदेश दिले होते. संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनावर सोपविण्यात आली होती.
मात्र, मतदान असलेल्या काही भागांसह पैठण शहरातील आठवडी बाजार सुरू असल्याचे तसेच दारू विक्रीही सुरू असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कितपत झाली, असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केले जात आहेत.
मतदानाच्या दिवशी निर्बंध असतानाही बाजारपेठ आणि दारू विक्री सुरू राहिल्याने संबंधित यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
No Comment! Be the first one.