लोकार्थ प्रतिनिधी परभणी आणि छत्रपती संभाजीनगर
परभणी : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) परभणी जिल्ह्यातील सेलू येथील मे. अभिनव फूड प्रॉडक्ट या हळद उत्पादक युनिटवर छापा टाकून मोठी कारवाई केली. तपासणीदरम्यान कारखान्यात अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले. त्यामुळे चिंतामणी ब्रँडची ४ हजार ३४८ किलो हळद पावडर, किंमत १३ लाख ४ हजार ४०० रुपये, जप्त करण्यात आली. तसेच कारखान्याचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी कृष्ण मुळे यांनी २२ ऑक्टोबर रोजी सेलू-वालूर रोडवरील ब्राह्मणगाव परिसरातील गट क्रमांक ३२/०१ येथे ही तपासणी केली. यावेळी हळद पावडर प्राथमिक पॅकेजिंगशिवाय थेट गोण्यांमध्ये भरलेली आढळली. कारखान्यात उंदीर, कीटक आणि त्यांच्या विष्ठेचे अंश आढळून आले. कामगारांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच अद्ययावत अन्न परवाना आणि कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसह आवश्यक स्वच्छता व्यवस्थेत त्रुटी आढळल्या.
तपासणीत कारखान्याला ८२ पैकी केवळ ३० गुण मिळाले. या गंभीर त्रुटींमुळे प्रशासनाने हळदीचा संपूर्ण साठा सीलबंद करून सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले असून, संबंधित युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

No Comment! Be the first one.