पुसेगावच्या अनिल ठोकेंच्या लघुचित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा; शेतकरी कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : दुष्काळाने करपलेली शेती, कर्जाचा वाढता डोंगर आणि सणासुदीच्या दिवसांतही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धडपड… शेतकऱ्यांच्या जगण्यातील हे वास्तव मांडणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील अनिल ठोके यांच्या ‘दुष्काळ : एक हृदयस्पर्शी कथा’ या लघुचित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने दोन लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा गाठला आहे.
‘अनिल ठोके फिल्म प्रोडक्शन’ या यूट्यूब चॅनेलवर १४ ऑक्टोबर रोजी हा लघुचित्रपट प्रदर्शित झाला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुःख, आर्थिक विवंचना आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे विस्कटलेले संसाराचे गणित या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
शेतकरी कर्ज काढून बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करतो. पिकांच्या वाढीसाठी दिवसरात्र कष्ट घेतो. मात्र, पावसाने ओढ दिली की वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरते. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे आव्हान उभे राहते. दिवाळीसारखा आनंदाचा सणही अशा कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरतो. मुलांना नवीन कपडे घेऊन देण्याची साधी इच्छाही परिस्थितीअभावी अपूर्ण राहते. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील ही विदारक परिस्थिती चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे.
केवळ एका शेतकरी कुटुंबाची कथा म्हणून या चित्रपटाकडे पाहता येणार नाही. दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक व आर्थिक वेदनांचे प्रतिबिंब त्यातून दिसते. वास्तववादी प्रसंग आणि भावनिक मांडणीमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.
अनिल ठोके यांनी यापूर्वीही विविध सामाजिक विषयांवर लघुचित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘वाटणी : एक हृदयस्पर्शी कथा’ भाग एक व दोन, ‘मदिरा : एक हृदयस्पर्शी कथा’, ‘वृद्धाश्रम’ आणि ‘मामाची हॉटेल’ या कलाकृतींतून त्यांनी ग्रामीण जीवनातील प्रश्न, कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
‘दुष्काळ’ या लघुचित्रपटातून त्यांनी शेतकऱ्यांच्या संघर्षाला वाचा फोडली आहे. या चित्रपटात अनिल ठोके यांच्यासह खंडू दिपके, देवानंद जिरे, तेजस्विनी बनसोडे, वीर ठोके, तुळशीराम धाबे, विकास सिरसाठ, बालाजी जैस्वाल, नंदकिशोर पवार, प्रवीण इंगोले आणि अनिल इंगोले यांनी भूमिका साकारल्या आहेत.
डिजिटल माध्यमांमुळे ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या कलाकृती थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. त्याचा प्रत्यय अनिल ठोके यांच्या ‘दुष्काळ’ या लघुचित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादातून येतो. स्थानिक कलाकार, ग्रामीण जीवनाशी निगडित कथानक आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची मांडणी यामुळे या चित्रपटाने अल्पावधीत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
दुष्काळ हा केवळ शेतीचा प्रश्न नाही, तर तो शेतकरी कुटुंबाच्या जगण्याशी आणि आनंदाशी जोडलेला आहे, हा संदेश या लघुचित्रपटातून प्रभावीपणे समोर येतो. पुसेगावसारख्या ग्रामीण भागातून साकारलेल्या या कलाकृतीला मिळालेला प्रतिसाद स्थानिक कलाविश्वासाठी आशादायी ठरत आहे.
No Comment! Be the first one.