धनंजय लांबे (Chief Editor Lokarth Media)
दसरा मेळावा निमित्त ठरलं आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिपच्या रुपात बॉम्बच टाकला. जरांगे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये पोहोचले, अशी माहिती तर श्वेता शालिनी नामक महिलेने या क्लिपमधून दिलीच, परंतु माध्यमांना कसं मॅनेज केलं जातं, याची मोडस ऑपेरेंडीही उघड झाली. अनेकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेले असले तरी इंटरनेटवर शोधल्यावर श्वेता शालिनी या भाजपच्या नेत्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार, भाजपच्या राज्य आणि प्रवक्त्यासुद्धा आहेत, ही माहिती ShwetaShalini.com या त्यांच्या वेबसाईटवरून मिळते. ही ऑडिओ क्लिप एव्हाना बरीच व्हायरल झालेली असल्यामुळे आपल्यापैकी बहुतेकांना त्यातील तपशील लक्षात आलाच असेल. बड्या दैनिकांच्या संपादकांपासून इन्फ्लुएन्सर्सपर्यंत अनेक नावे चणे फुटाणे खावेत तसे या महाभागांनी या क्लिपमध्ये घेतल्याचे दिसते. कोणताही निर्णय किंवा अडचणीची गोपनीय माहिती उघड झाली की राजकीय लोक त्या माहितीची सत्यता तपासण्याची घोषणा करतात. तशीच ती यावेळी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनोज जरांगे यांनी ही क्लिप एका कॉन्फरन्स कॉलची असून ती एआयद्वारे कशी तयार करता येईल, असा थेट प्रश्न केला आहे आणि त्यात तथ्यही आहे. मात्र, या क्लिपनं भाजपला अडचणीत आणल्यामुळे ती खोटी ठरवण्याचे सर्व प्रयत्न केले जातील, अशी शंका घेण्यास वाव आहे.
माध्यमांना मॅनेज करण्याची सुपारी
राज्यातील महायुती सरकारच्या दोन प्रमुख पक्षांमध्ये या क्लिपमुळे वितुष्ट आलं हे उघडच आहे. आपल्यावर पाचशे कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणारे हे कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी जरांगे यांनी केली, पण श्वेता शालिनी या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्यासह या क्लिपमध्ये जी मंडळी आहे, ती देखील मुख्यमंत्र्यांच्या वाटेतील काटे झाडून बाजूला करण्याचं कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची सुतराम शक्यता नाही. हे काटे हटवण्याचा कोणताही मोबदला ते घेत नसतील तर त्यांच्यासारखे सज्जन या राज्यात शोधूनही सापडणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणाऱ्या प्रत्येक घटकाला नामोहरम करून माघार घेण्यास भाग पाडणारी ही तीन-चारच डोकी नाहीत. राज्यातल्या प्रत्येक शहरात अशी अनेक डोकी आहेत. मुख्यमंत्री किंवा भाजपविरुद्ध जो कोणी डोकं वर काढतो, त्याला ‘मॅनेज’ करण्याचे ठेके असे लोक घेत असतात. त्यासाठी वृत्तपत्रांमधून लेख छापून आणण्याची, समाज माध्यमांवर खोटी माहिती पेरण्याची, म्हणजेच नरेटीव सेट करण्याची सुपारी ही मंडळी घेत असते. परंतु मनोज जरांगे या सर्वांना पुरून उरले. त्यांच्या गुप्तहेरांनी ही क्लिप मिळवली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवली. ज्यांनी ही क्लिप पोचवली त्यांनीही थोडी बदमाशी केलीच. जरांगे यांच्या आधी एका वृत्तवाहिनीला ही क्लिप देण्यात आली आणि जरांगे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आगपाखड करीत असलेल्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनाही देण्यात आली. त्यामुळे जरांगे यांनी गौप्यस्फोट करण्याआधीच ही क्लिप व्हयरल झाली.
भाजपला एकनाथ शिंदे यांचे आव्हान
राज्यात भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे एकमेव नेते आहेत एकनाथ शिंदे. त्यांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी फडणवीस यांचे बगलबच्चे सरसावले आहेत, असाही अर्थ या क्लिपमधून काढता येतो. म्हणूनच क्लिप मधील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटलेली असताना तिच्या फॉरेन्सिक तपासणीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. वास्तविक, सरकारची विश्वासार्हता धुळीस मिळवणारी ही क्लिप लाखो नागरिकांपर्यंत पोचल्याचे लक्षात येताच क्लिपमधील संबंधितांवर कारवाई व्हायला हवी होती. परंतु या ‘हितचिंतकां’ना वाचवण्यासाठी आकाश- पाताळ एक केले जात आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांसाठी किती ‘उपयुक्त’ आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, असा दावा करून श्वेता शालिनी यांनी हात झटकले आहेत. परंतु, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उदय सामंत यांनी हा आवाज श्वेता शालिनी यांच्या आवाजासारखाच आहे, असे सांगून टाकले. या क्लिपमध्ये भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांचा आणि एका यूट्युबरचाही आवाज असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे कितीही सारवासारव केली तरी क्लिपमधील नावं जगजाहीर झाली आहेत.
शिवसेनेवर कुरघोडी
महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी तशी इच्छाच स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळवण्याचा प्रयत्न पुढच्या निवडणुकीत असेल, असेही ते म्हणाले आहेत आणि शिवसेनेची ही महत्त्वाकांक्षा धुळीस मिळवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. व्हायरल क्लिप त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. मनोज जरांगे आणि श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचा हा डाव होता. रामदास कदम म्हणतात त्याप्रमाणे ही क्लिप 2024 ची असली तरी भाजपच्या रणनीतीमध्ये फारसा फरक दोन वर्षात झाला असेल असे मानण्याचे कारण नाही. शिवाय, ही क्लिप बाहेर कशी आली, हे सुद्धा गूढच आहे. क्लिपच्या चौकशीमधून फार काही बाहेर येईल, अशी शक्यता नाही. सत्तेतले हे दोन पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकदा जुळवून घेतील, पण मुख्य खुर्ची ताब्यात ठेवण्याचे खटाटोप सुरूच राहतील. तूर्तास, क्लिपचा खुलासा करण्याची जबाबदारी भाजपवर आहे. दुसरा एखादा मुद्दा पुढे येत नाही, तोपर्यंत यावरच चर्चा होत राहील. एवढं मात्र खरं की, या क्लिपमध्ये जरांगे पाटलांचे नाव नसते, तर कदाचित ती बाहेर आलीही नसती.
No Comment! Be the first one.