ढोरेगाव केंद्रातील ‘उल्लास’ साक्षरता परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३ केंद्रांवर १९८ नवसाक्षरांचा सहभाग
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड गंगापूर
गंगापूर वयाची मर्यादा ओलांडून शिक्षणाची ओढ जपणाऱ्या आजी-आजोबांच्या हातात लेखणी आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या चिमुकल्या नातवंडांच्या डोळ्यांत कुतूहल, असे भावस्पर्शी चित्र ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित ‘उल्लास’ साक्षरता परीक्षेदरम्यान पाहायला मिळाले. केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीला नवसाक्षरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोरेगाव केंद्रांतर्गत १३ परीक्षा केंद्रांवर एकूण १९८ नवसाक्षरांनी आनंदाने परीक्षा दिली.
समाजातील निरक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात वाचन-लेखनाची आवड निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात संख्याज्ञानाचा प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात आली. ढोरेगाव येथील परीक्षा केंद्रावर ५० नवसाक्षरांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञानविषयक कौशल्यांचे मूल्यमापन करण्यात आले.
फुलांच्या गुच्छांनी स्वागत; भीती दूर, आत्मविश्वासात वाढ!
नवसाक्षर परीक्षार्थींचे परीक्षा केंद्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. फुलांचे गुच्छ देऊन त्यांना सन्मानाने वर्गात प्रवेश देण्यात आला. या स्वागतामुळे परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला. शिक्षणाच्या प्रवासात पुन्हा एकदा पाऊल टाकणाऱ्या या नवसाक्षरांसाठी हा क्षण संस्मरणीय ठरला.
आजी-आजोबा पेपर सोडवताना नातवंडेही उत्सुक!
या परीक्षेतील सर्वांत लक्षवेधी दृश्य म्हणजे काही आजी आपल्या नातू-नातींना सोबत घेऊन परीक्षा केंद्रात दाखल झाल्या होत्या. आजी-आजोबा एकाग्रतेने प्रश्नपत्रिका सोडवत असताना चिमुकली नातवंडेही कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत होती. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण घेता येते, हा संदेश देणारे हे दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले. शिक्षणाची ओढ, शिकण्याची जिद्द आणि कुटुंबीयांची साथ यांचा सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला.
१३ परीक्षा केंद्रांवर नियोजनबद्ध आयोजन
केंद्रप्रमुख सचिन डमाळे आणि प्रभारी केंद्रीय मुख्याध्यापक राजेश हिवाळे यांच्या नियंत्रणाखाली ढोरेगाव केंद्रांतर्गत ढोरेगाव, पुरी, दहेगाव, पेंडापूर, मुरमी, कदीम शहापूर, सारंगपूर, पदमपूर, सोलेगाव, हनुमंतगाव, पिंपळवाडी, सय्यदपूर आणि न्यू हायस्कूल या १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. शिक्षक मनोज घुले, दिलीप धर्माधिकारी आणि भाऊसाहेब गाढवे यांनी नियोजन व पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडली.
‘प्रत्येक व्यक्ती साक्षर, सक्षम आणि स्वावलंबी’ या संकल्पनेला बळ देणारा ‘उल्लास’ उपक्रम नवसाक्षरांसाठी आत्मविश्वासाचा नवा मार्ग ठरत आहे. वयाचे बंधन बाजूला ठेवून शिकण्याची तयारी दाखविणाऱ्या परीक्षार्थींचा सहभाग आणि त्यांना मिळालेली सन्मानाची वागणूक यामुळे साक्षर समाजनिर्मितीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडले आहे.
No Comment! Be the first one.