६८ आस्थापनांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणी २० आरोपींना अटक
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ मोहीम राबवली. या मोहिमेत १२.७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६८ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली, तर सात आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सात विभागांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत निकृष्ट, संभाव्य भेसळयुक्त आणि चुकीचे लेबल असलेला ९.११ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त किंवा नष्ट करण्यात आला. तसेच ठाणे आणि पुणे जिल्ह्यांत विल्हेवाटीसाठी पाठविलेले ८,३९२ किलो मुदतबाह्य, खराब किंवा नाकारलेले अन्न पुन्हा बाजारात आणले जात असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर विभागातील दोन शीतगृहांतून ४.१९ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातील कारवाईत ३.१५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २२ गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी २० आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय चार आस्थापनांकडून १.३० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
No Comment! Be the first one.