विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अवैध वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत २२२ कारवाया करून ९३ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वाळू व वाहनांसह तब्बल २८ कोटी २२ लाख ७४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीसोबतच वाळू साठवणुकीच्या डम्पिंगवरही लक्ष केंद्रित केले आहे.
२०२५ मध्ये याच कालावधीत ८३ कारवाया झाल्या होत्या. त्या तुलनेत २०२६ मध्ये कारवायांमध्ये २६७.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अटक आरोपींची संख्या २४ वरून ९३ झाल्याने त्यातही मोठी वाढ झाली आहे.
अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ५३ वाहनांच्या निलंबनाचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून, त्यापैकी २९ वाहनांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच ७५ वाहनचालकांच्या परवाना निलंबन प्रस्तावांपैकी ६३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. १८९ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून बंधपत्र घेण्यात आले आहे.
अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतुकीला मदत करणाऱ्या व्यक्ती अथवा टोळीची गय केली जाणार नसून, वारंवार गुन्हे करणाऱ्यांविरोधात एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी दिला आहे.
No Comment! Be the first one.