विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अनधिकृत रेल्वे तिकीट बुकिंग आणि तिकीट दलालीला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर दोघांविरुद्ध कारवाई केली. RPF छत्रपती संभाजीनगर आणि CIB/RPF नांदेडच्या संयुक्त पथकाने ८ सप्टेंबर रोजी रेल्वे आरक्षण केंद्रावर पाळत ठेवून ही कारवाई केली.
यावेळी जतीन जैस्वाल आणि कलमुद्दीन खान यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघे प्रवाशांकडून कमिशन घेऊन त्यांच्या वतीने रेल्वे आरक्षणाची तिकिटे काढत असल्याचे समोर आले.
कारवाईदरम्यान १२ प्रवाशांसाठीची दोन खुली 3AC आरक्षण तिकिटे, एकूण २४ हजार ९० रुपयांची, तसेच दोन कोरे आरक्षण मागणी अर्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी RPF छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ नोंदवून रेल्वे अधिनियम १९८९ मधील कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
दोघांना संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार नोटीस बजावून सोडण्यात आले असून, न्यायालयाचा समन्स प्राप्त झाल्यानंतर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
No Comment! Be the first one.