विजय देऊळगावकर
पैठण : गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने पैठण तहसील कार्यालयात समन्वय व शांतता समितीची बैठक घेण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस पैठण, एम.आय.डी.सी. पैठण, बिडकीन व पाचोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस पाटील, गणेश मंडळांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, प्रतिष्ठित नागरिक तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव डीजेमुक्त वातावरणात साजरा करून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस सोनाली पैकवार, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, भरत मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No Comment! Be the first one.