एफडीएच्या तपासणीत ९६ पैकी केवळ १७ गुण; अस्वच्छतेसह अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोलवाडी लिंक रोडवरील ‘द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’मधील अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रेस्टॉरंटचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे. १५ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी १२ ऑक्टोबर रोजी रेस्टॉरंटची अचानक तपासणी केली. या तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, तुटलेल्या फरशा, भिंतींचे उखडलेले प्लास्टर, गंजलेला व तुटलेला फ्रिज, तसेच कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव आढळला. कच्चे व शिजवलेले तसेच शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचेही समोर आले.
याशिवाय पिण्याचे पाणी व कच्च्या मालाच्या गुणवत्तेची तपासणी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रे आणि अन्न हाताळताना आवश्यक सुरक्षित पोशाख याबाबतही त्रुटी आढळल्या. एफओएससीओएस तपासणी अहवालात रेस्टॉरंटला ९६ पैकी केवळ १७ गुण, म्हणजेच १८ टक्के गुण मिळाले.
या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ३२ अंतर्गत परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. निलंबनाच्या काळात रेस्टॉरंटला अन्नपदार्थांची निर्मिती, विक्री, साठवणूक व वितरण करता येणार नाही. आवश्यक सुधारणा करून अनुपालन अहवाल सादर केल्यानंतर आणि प्रशासनाच्या फेरतपासणीत समाधानकारक स्थिती आढळल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
No Comment! Be the first one.