४८ लाखांच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात विशेषाधिकार भंगाचा मुद्दा;
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना – जालना महानगरपालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादात आता महाराष्ट्र विधानमंडळाच्या विशेषाधिकार समितीने हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेच्या सहा अधिकाऱ्यांना साक्ष नोंदविण्यासाठी मुंबईतील विधान भवनात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जालना शहरातील सुमारे ४८ लाख रुपयांच्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांना निमंत्रण न दिल्याने त्यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विशेषाधिकार भंगाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, अतिरिक्त आयुक्त नंदा गायकवाड, नगरसचिव, संबंधित अभियंते तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती संध्या ढेरे यांना २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील विधान भवनात साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महानगरपालिका स्थापनेनंतर दहा महिन्यांत वाद
जालना महानगरपालिकेची स्थापना होऊन अवघे दहा महिने झाले आहेत. मात्र, या कालावधीत महानगरपालिकेतील विविध विषयांवरून चर्चा आणि वाद सुरू असल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी आयोजित केलेल्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावरून हा वाद निर्माण झाला.
या सोहळ्यादरम्यान राजशिष्टाचारविषयक निर्देशांचे पालन झाले होते की नाही, याबाबत विशेषाधिकार समितीसमोर सुनावणी होणार आहे. या प्रक्रियेत नेमके काय निष्पन्न होते, याकडे जालनेकरांचे लक्ष लागले आहे.
आता विशेषाधिकार समितीच्या सुनावणीत संबंधित अधिकारी काय भूमिका मांडतात आणि या प्रकरणात पुढे कोणती कार्यवाही होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
No Comment! Be the first one.