पैशांसाठी विवाहितेला मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप; भावाच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याची तक्रार
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : पुणे येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे न आणल्यास विवाहितेच्या भावाच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनिता अमोल जाधव (वय १९, सध्या रा. तांदुळवाडी, ता. गंगापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १ एप्रिल २०२६ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पैठण तालुक्यातील फारोळा येथील सासरी तसेच पुणे येथील ठिकाणी हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादीने आपल्या आई-वडिलांकडून २० लाख रुपये घेऊन यावेत, अशी मागणी आरोपींनी संगनमताने केल्याचा आरोप आहे. या मागणीवरून फिर्यादीला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली, तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पैसे आणले नाहीत तर पुण्यात राहणाऱ्या फिर्यादीचा भाऊ निखिल याच्या जिवाचे बरेवाईट करू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणी पती अमोल नंदकिशोर जाधव, सासरे नंदकिशोर पुंजाराम जाधव, सासू यशोदा जाधव, दीर अजिंक्य जाधव, आजीसासू आशाबाई जाधव आणि नणंद निकिता देसाई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर पोलीस ठाण्यात २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार घोडके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

No Comment! Be the first one.