जालना वडीगोद्री महामार्ग अर्धा तास रोखला
लोकार्थ प्रतिनिधी पंकज पवार
अंबड: अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटवून शाळेची हक्काची जागा मोकळी करून देण्याच्या मागणीसाठी
घुंगर्डे हादगाव येथील संतप्त नागरिकांनी जालना वडीगोद्री मार्गांवरील पेट्रोल पंप जवळ दि.27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अर्धातास रास्ता रोको करण्यात आला.
या रास्ता रोको दरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सदर मागणीचे निवेदन मंडळाधिकारी काटकर यांना दिले.
गेल्या 12 दिवसापासून शाळेच्या दानपत्र जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेत उद्धवसिंग पवार यांचे आमरण उपोषण सुरूआहे.
घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दानपात्र जमिनीवरील अतिक्रमण हटवून शाळेची जागा अतिक्रमणमुक्त करावी, शाळेच्या जमिनीला संरक्षण भिंत किंवा कुंपण घालण्यात यावे, तसेच सार्वजनिक व शैक्षणिक मालमत्तेच्या नुकसानीसंदर्भात नियमानुसार कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. शाळेच्या मालमत्तेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शाळेला तिच्या हक्काची जमीन उपलब्ध झाल्यास शैक्षणिक उपक्रमांसाठी जागेचा योग्य वापर करता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
१. शाळेच्या दानपात्र जमिनीची तात्काळ साफसफाई करून जागा ताब्यात घ्यावी.
२. जमिनीवरील सर्व बेकायदेशीर व अनधिकृत अतिक्रमण तातडीने हटवावे.
३. संबंधित जागेला कायमस्वरूपी पक्के तारकुंपण किंवा संरक्षण भिंत उभारावी.
४. सार्वजनिक व शैक्षणिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

No Comment! Be the first one.